गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र बच्चन पिता-पुत्रांच्या बहुचर्चित “पा” या चित्रपटाचे प्रोमोज दिसू लागले आहेत. रंगभूषाकारासाठी एक प्रचंड आव्हान असलेली या चित्रपटातील ’प्रोजेरिया’ या आजाराने बाधित मुलाची [?] अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली भूमिका सगळी बक्षिसे पटकावेल याबद्द्ल दुमत नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक गोष्टींना चालना मिळेल यात वाद नाही. जसे, अचानक संपूर्ण दुनियेत केवळ ६०-७० रुग्ण असलेल्या प्रोजेरिया या आजाराबाबत जागृती निर्माण होईल. इतर सारे आजार विसरुन सारा देश या दुर्मिळ आजाराबद्द्ल माहिती गोळा करु लागेल [जसे दरवर्षी हजारो बळी टिपणार्या डेंग्यू अथवा (अतीसामान्य) हगवणीपेक्षा, आजवर केवळ (!) १०० बळी घेतलेल्या स्वाईन-फ्लू बद्द्ल आपल्याला जास्त माहिती आहे].
पण याच चित्रपटाच्या अनुशंगाने एका मुद्दयावरही चिंतन व्हायला हवे आहे, तो म्हणजे आपल्याकडील वैद्यकिय, तांत्रीक अथवा कायदेविषयक विषयांवर आधारित चित्रपटांमधून दर्शकांना त्या-त्या विषयाबाबत मिळणारे ज्ञान. जरी परिस्थिती बरिचशी सुधारली असली तरी अजुनही शैक्षणिक, वैद्यकिय, तंत्रज्ञान, व खास करुन न्यायव्यवस्था यांची आपल्या चित्रपटांतून वास्तवदर्शी प्रतिमा अभावानेच दिसते. आपणच म्हणतो, “अरे तो पिक्चर आहे, चालायचंच!!” असे का? आपले चित्रपट वास्तवदर्शी का नसावेत? करोडो रुपयांची बजेट्स असणार्या चित्रपटांची तांत्रिक बाजू का भक्कम नसावी?
’बेंजामिन बटन’ या चित्रपटात अखेरीला ब्रॅड पीट जर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोरसवदा मुलगा दिसू शकतो, त्याच चित्रपटात तो सुरवातीला २-३ फुट उंचीचा जख्खड म्हातारा दाखवता येऊ शकतो तर ते आपल्याला का शक्य नाही. प्रोजेरिया या रोगामधे, मुलांच्या शरीराची एखाद्या वृध्द माणसासारखी अवस्था होते, पण उंचीने हि मुले त्यांच्या वयाचीच राहतात, त्यांची उंची काही ५-६ फूट होत नाही. याच मुद्दयाकडे प्रामुख्याने ’पा’ दुर्लक्ष झाले आहे. यातिल ’ऑरो’ त्याच्या आईपेक्षा काही इंच उंच दिसतो आणि दार्शनिकदृष्ट्या चित्रपट मार खातो. असे सांगीतले जात आहे की भरभक्कम किंमत मोजून केंब्रिजसारख्या नावाजलेल्या विद्यापीठाच्या आवारांत या चित्रपटातील काही भाग चित्रीत केला आहे. त्यापेक्षा हा पैसा अमिताभला ३ फूट उंचीचा दाखवायला वापरला असता तर?
दार्शनिक भाग जाऊ दे, पण जर आपली कथा एखाद्या आजारावर आधारित असेल, तर त्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णाची मानसीक आंदोलने आपल्याला क्वचीतच पहायला मिळतात [सन्माननीय अपवाद - स्पर्श चित्रपटातील अंध]. “पा” मधेही बच्चन पिता-पुत्र असल्याने, व प्रोमोज वरुन जी शितं हाती येत आहेत, त्यामुळे कथा प्रोजेरिया वरुन सुरु होऊन मसाल्यात गुरफटणार याचे भाकित करण्यासाठी कुंडलीची ही गरज नाही.
पण आपल्याकडे असे का नाही हे विचारायचे नाही… कारण आपल्याकडे व्यक्तिपेक्षा, भावनांपेक्षा व पब्लिकपेक्षा काहीच मोठे नाही. आणि अर्थात, वैद्यकिय, तांत्रिक, कायदेशीर व शास्त्रीयदृष्ट्या योग्य असे पिक्चर बघायचे असतील तर हॉलिवूड आहेच की!!
