ढेकणांचा अड्डा

ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण
भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून
पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा
फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा
झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या
अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा
आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती
त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती
तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी
दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी
भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे
नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे
पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे
गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे

डासाचे गाणे

डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा?
माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा?
डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो
जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो
फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं
लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं
ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट
सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट
भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई
पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी

ज्याचा त्याचा देव

’देवबाप्पा खूप पॉवरफुल व ग्रेट आहे. त्याला सर्व जगाची काळजी असते. देवबाप्पाला शांत मुले व मोठ्यांचे ऎकणारी मुलेच आवडतात. तो आपले सारे हट्ट पुरे करतो. आजी म्हणते की आपण त्याचे ऎकले नाही की त्याचा कोप होतो, तो चिडतो व आपल्याला शाप देतो. तो खुश असेल तर आपण मागू ते मिळतं… मी कधीच देवबाप्पाला भेटलेलो नाही पण तो जसा वागतो अगदी तसेच माझे बाबा सुध्दा वागतात, मग माझे बाबाच देव आहेत का?’ – इयत्ता तिसरीमधील एका मुलाने विचारलेला एक प्रश्न.

काय उत्तर देणार?

तुम्ही देव माना अथवा मानू नका, पण प्रत्येकाचे देवाबद्दल काही ना काहीतरी मत हे असतेच, मग ते अगदी देवाला कधी रिटायर करायचे, याबद्दल का असेना. देव ही एक संकल्पनाच आहे, पण काहींच्या मते तो अनुभवही आहे. काहींच्या जीवनात असे प्रसंग घडले आहेत की त्यांना चमत्कारच म्हणता येईल. पण या लेखामागे माझा देवाच्या या कामांचा विचार नाही. माझ्या मनातील प्रश्न याहूनही मूलभूत आहेत.

एक तर त्या तिसरीतल्या मुलाप्रमाणेच मलाही हा प्रश्न पडतो की जर त्याच्या मनासारखे केले नाही तर देव चिडणार असेल, जर त्याला अमुक पदार्थ – तमुक फुल किंवा अमकाच रंग आवडणार असेल, तर त्याच्यात अन माझ्यात काय फरक? त्यानेच निर्माण केलेल्या भावना व वासनांवर त्याचाच कंट्रोल असायला हवा की नको?

मला असे शिकवले गेले की देव सर्वशक्तिमान आहे व त्यानेच या सर्व जगताची, त्यातील निसर्गाची, प्राणीमात्रांची [त्यात आपणही आलो] व संपूर्ण ग्रहमालेची निर्मिती केली आहे. तो अनादि, अनंत, अजिंक्य, अवध्य, अमर, अजेय,… इत्यादी अनेक विशेषगुणांनी युक्त आहे. जर हे सगळे मान्य केले, तर फक्त मानव जमातीलाच त्याची ओळख का? आजवर आपल्यापैकी कुणालाही, एखादा प्राणी अथवा पक्षी कोणत्याही देवाची उपासना [सगुण/निर्गुण] करताना दिसलाय? नक्कीच नाही! अन्‌ मग, देवाबद्दल इतकी अनास्था (?) दाखवूनही पशु-पक्षांचे काही बिघडले आहे असेही वाटत नाही. मग नक्की गोची कशात आहे? गोची आहे ती देव या संकल्पनेतच. कारण संकल्पना म्हणली की त्यात व्यक्तिसापेक्षताही आली अन त्यातूनच आला जन्माला “ज्याचा त्याचा देव”. मला वाटते, आपल्या लहानपणी ऎकलेला, पूर्वापार चालत आलेला, देवाच्या लोकसंख्येचा आकडा [तेहेतीस कोटी] कदाचीत त्याकाळची जगाची लोकसंख्या दर्शवीत असेल, अन त्यातून आपल्या ज्ञानी पूर्वजांना असेच सुचवायचे असेल की देव हा बाहेर कुठेही नसून तुमच्यातच आहे. त्याची आराधना करा.

निसर्गाशी एकरुप होऊन जगणारे प्राणी फक्त शरीरधर्माचे पालन करतात. मनुष्य त्यांच्यापेक्षा निश्चितच पुढारलेला आहे. त्याने त्या शरीरधर्माला नीतीमत्तेची व समाजकारणाची जोड दिली, पण यातूनच जन्माला आले देव नावाचे एक मृगजळ. निसर्ग नावाच्या सर्वशक्तिमान व सर्वसमावेशक घटकाचे एक भोंगळ रुप. ’देवाला रिटायर करा’ या विधानाला कडकडून विरोध करण्यापेक्षा, त्यामागचा विचार जाणून घेणे गरजेचे आहे. या विधानाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की आपला देवावरचा अंधविश्वास काढून त्याजागी स्वत:वरचा, इतरांवरचा विश्वास वाढीस लावण्याची गरज आहे. माझ्यामते, असे केल्याने जगात घडणार्‍या तथाकथित दैवी चमत्कारांमधे वाढ होईल व हेही कळेल की या सर्वाचा कर्ता करविता बाकी कोणी नसून, आपल्यातलाच देव आहे.

असे असले तरी ’देव’ या संकल्पनेचे फायदेही बरेच आहेत. त्यातूनच जन्मास आलेल्या स्वर्ग-नरक या उप-संकल्पनेच्या आकर्षणापोटी अथवा भीतीपायी समाजातील नीतीमत्तेची पातळी टिकून राहते. देवाला नवस बोलल्यावर, त्याची मनोभावे प्रार्थना केल्यावर मिळणार्‍या आत्मिक बळामधे अनेक संकटांना तोंड देण्याची शक्ती असते. अन्‌ त्याहुनहि महत्वाचे, म्हणजे या संकटातून पार झाल्यानंतर किंवा एखादी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट साध्य केल्यानंतर त्याचे श्रेय देवाला दिल्यामुळे आपल्या डोक्यात अहंतेची हवा कमी भरते. आपण सोडुन इतर अनेक घटकांचा आपल्या यशात वाटा आहे, हा विचारच आपल्याला जमिनीवर ठेवण्यात मदत करतो. संकटाच्या काळी हमखास जाणवणार्‍या एकाकीपणावर “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे..” हे एक चांगले मलम आहे.

“ॐ पूर्णमिदं। पूर्णात्‌ पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।”

( ओम! हे पूर्ण आहे. पूर्णातूनच पूर्ण जन्माला येते. पूर्णातून पूर्ण बाहेर आल्यावरहि पूर्णच शिल्लक राहते. )

आपल्या उपनिषदांमधे उधृत केलेल्या या सर्वव्यापी शक्तिच्या संज्ञेशी पूर्णपणे साधर्म्य साधणारी गोष्ट म्हणजे निसर्ग. नैसर्गिक तत्वांतूनच या जगताची निर्मिती झाली, यापुढेही निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट निसर्गातील तत्वांमधूनच निर्माण होणार आहे, यातील कोणत्याही किंवा सगळ्या गोष्टींचा विनाश पावला तरी जे शिल्लक राहील त्यालाही निसर्गच म्हणले जाईल [केवळ त्याचे रुप वेगळे असेल]. थोडक्यात, आपल्या आजुबाजुला जे जे काही आपल्याला दिसते ते, व त्याहीपेक्षा खुप काही, जे आपल्या दृष्टीपलिकडचे आहे, सर्व निसर्गाचीच रुपं आहेत. जसे फुल, पाने, डोंगर, माती, वारा, सुगंध; तसेच कॅरीबॅग, गर्द, ए-के ४७ व प्रदुषण. निसर्गाच्या एका रुपाने [मानव] स्वत:च्या शक्तिबद्दल असलेल्या अघोरी व भ्रामक कल्पनांना बळी जाऊन, निसर्गाच्या इतर काही रुपांपासून निर्माण केलेली ही काही कु-रुपे. आज सर्वत्र असा ओरडा होत आहे की ही कुरुपे निसर्गाला हानिकारक आहेत, पण खरं तर फार काळ निसर्गाचे काहीच बिघडणार नाहीये. निसर्गाच्या अस्तित्वाला तर यातून काहिच धोका नाही, असेल तो आहे फक्त आपल्याला. यातून जर काही नष्ट होणार असेल तर ती आहे मानवजात, निसर्ग नव्हे. आपल्या आजच्या प्रचलित कल्पनेप्रमाणे एका प्रचंड उल्कापातानंतर पृथ्वीवरील महाकाय सजीव [डायनासोर] नष्ट झाले, पण तरिही काही [कोटी] वर्षात निसर्गाने काश्मिर, स्विट्झर्लंड, वर्षावने, एव्हरेस्ट, वाळवंटे, इतकेच काय पण वर्षाला प्रत्येकी एक याप्रमाणे मिस-युनिवर्स व मिस-वर्ल्ड यांची निर्मिती केलीच की! सजीवसृष्टीचा विनाश करणार्‍या त्या उल्का-संकटाने निसर्गाचे काहीच बिघडले नाही कारण तो उल्कापातही निसर्गाचाच एक भाग होता हो!! सांगायचा मुद्दा असा की वरीलपैकी प्लॅस्टीक, प्रदूषण व सध्याचे ग्लोबल वॉर्मींग यांचा धोका फक्त सजीवांना आहे, निसर्गाला नाही, कारण पृथ्वी, त्याभोवतालचा ओझोनचे कवच, त्याला सध्या आपण पाडत असलेले भोक व त्यापलिकडचा सूर्य व त्याची अतीनील किरणे… हे सगळं सगळं निसर्गचाच एक भाग आहे. नष्ट होणार आहे तो निसर्गाचा एक घटक, निसर्ग नक्कीच नव्हे.

त्यामुळे उपासना करायची असेल तर निसर्गाची करुया. तीही निसर्गाच्याच पध्दतीने, कारण खरा देव आहे निसर्ग. तुम्ही त्याच्या नियमांचे पालन केलेत तर त्याच्या सारखा दाता नाही. तुम्ही पालन केले नाहीत तरी तो पुरेशी पूर्वकल्पना देऊन आपला हिसका [?] दाखवतो. या जगतातील सर्व सजीव व निर्जिवही त्याच्याच नियमांचे पालन करतात, व त्याच्याच इशार्‍यांवर अवलंबून असतात. कळत नकळत सर्व चराचर सृष्टी निसर्ग नामक शक्तीला मनापासुन मानते. पण हे सगळे, सगळ्यांत सर्वात हुषार असलेल्या माणसांनाच हे कधी पटणार, “देव जाणे!!”

“पा”हण्यासारखा की “पा”नचट ?

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र बच्चन पिता-पुत्रांच्या बहुचर्चित “पा” या चित्रपटाचे प्रोमोज दिसू लागले आहेत. रंगभूषाकारासाठी एक प्रचंड आव्हान असलेली या चित्रपटातील ’प्रोजेरिया’ या आजाराने बाधित मुलाची [?] अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली भूमिका सगळी बक्षिसे पटकावेल याबद्द्ल दुमत नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक गोष्टींना चालना मिळेल यात वाद नाही. जसे, अचानक संपूर्ण दुनियेत केवळ ६०-७० रुग्ण असलेल्या प्रोजेरिया या आजाराबाबत जागृती निर्माण होईल. इतर सारे आजार विसरुन सारा देश या दुर्मिळ आजाराबद्द्ल माहिती गोळा करु लागेल [जसे दरवर्षी हजारो बळी टिपणार्‍या डेंग्यू अथवा (अतीसामान्य) हगवणीपेक्षा, आजवर केवळ (!) १०० बळी घेतलेल्या स्वाईन-फ्लू बद्द्ल आपल्याला जास्त माहिती आहे].

पण याच चित्रपटाच्या अनुशंगाने एका मुद्दयावरही चिंतन व्हायला हवे आहे, तो म्हणजे आपल्याकडील वैद्यकिय, तांत्रीक अथवा कायदेविषयक विषयांवर आधारित चित्रपटांमधून दर्शकांना त्या-त्या विषयाबाबत मिळणारे ज्ञान. जरी परिस्थिती बरिचशी सुधारली असली तरी अजुनही शैक्षणिक, वैद्यकिय, तंत्रज्ञान, व खास करुन न्यायव्यवस्था यांची आपल्या चित्रपटांतून वास्तवदर्शी प्रतिमा अभावानेच दिसते. आपणच म्हणतो, “अरे तो पिक्चर आहे, चालायचंच!!” असे का? आपले चित्रपट वास्तवदर्शी का नसावेत? करोडो रुपयांची बजेट्स असणार्‍या चित्रपटांची तांत्रिक बाजू का भक्कम नसावी?

’बेंजामिन बटन’ या चित्रपटात अखेरीला ब्रॅड पीट जर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोरसवदा मुलगा दिसू शकतो, त्याच चित्रपटात तो सुरवातीला २-३ फुट उंचीचा जख्खड म्हातारा दाखवता येऊ शकतो तर ते आपल्याला का शक्य नाही. प्रोजेरिया या रोगामधे, मुलांच्या शरीराची एखाद्या वृध्द माणसासारखी अवस्था होते, पण उंचीने हि मुले त्यांच्या वयाचीच राहतात, त्यांची उंची काही ५-६ फूट होत नाही. याच मुद्दयाकडे प्रामुख्याने ’पा’ दुर्लक्ष झाले आहे. यातिल ’ऑरो’ त्याच्या आईपेक्षा काही इंच उंच दिसतो आणि दार्शनिकदृष्ट्या चित्रपट मार खातो. असे सांगीतले जात आहे की भरभक्कम किंमत मोजून केंब्रिजसारख्या नावाजलेल्या विद्यापीठाच्या आवारांत या चित्रपटातील काही भाग चित्रीत केला आहे. त्यापेक्षा हा पैसा अमिताभला ३ फूट उंचीचा दाखवायला वापरला असता तर?

दार्शनिक भाग जाऊ दे, पण जर आपली कथा एखाद्या आजारावर आधारित असेल, तर त्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णाची मानसीक आंदोलने आपल्याला क्वचीतच पहायला मिळतात [सन्माननीय अपवाद – स्पर्श चित्रपटातील अंध]. “पा” मधेही बच्चन पिता-पुत्र असल्याने, व प्रोमोज वरुन जी शितं हाती येत आहेत, त्यामुळे कथा प्रोजेरिया वरुन सुरु होऊन मसाल्यात गुरफटणार याचे भाकित करण्यासाठी कुंडलीची ही गरज नाही.

पण आपल्याकडे असे का नाही हे विचारायचे नाही… कारण आपल्याकडे व्यक्तिपेक्षा, भावनांपेक्षा व पब्लिकपेक्षा काहीच मोठे नाही. आणि अर्थात, वैद्यकिय, तांत्रिक, कायदेशीर व शास्त्रीयदृष्ट्या योग्य असे पिक्चर बघायचे असतील तर हॉलिवूड आहेच की!!

माय (my) मराठी…

आजकाल बरेचदा गप्पांमधून मराठी भाषेच्या ढासळत्या (?) स्थितीबद्दल आपण चर्चा करीत असतो. अन तसे वाटणेही काही गैर नाही. टीव्ही, रेडियो, चित्रपट आणि अनेक जाहीर समारंभातून आपण शाळेत शिकलेल्या किंवा घरात बोलत असलेल्या मराठी भाषेपेक्षा वेगळीच भाषा ऎकायला व वाचायला मिळत असते. त्यातही टीव्हीवरील हेड्लाईन्स वा स्क्रिनच्या खालच्या बाजूला सरकणार्‍या पट्ट्यांवरचे शुध्दलेखन तर इतके भयानक असते की बरेचदा अनुस्वार जागच्या जागी न देण्याकरिताच यांना पगार मिळतो का?, असा प्रश्न पडावा. याच्या उलट, आपल्या लहानपणी दूरदर्शन [एकच चॅनल होता बिचारा] वरील लिखाण हे शुध्दलेखनाचे मापदंड म्हणुनही वापरता यावे इतके शुध्द असायचे.

पुण्यासारख्या शहरात वावरताना, दिवसातून हमखास एकदा तरी आपण “न / ण” च्या वापरावरुन नाके मुरडतो. “णाव काय तुमचे?” किंवा “पानी घेनार का?” असं ऎकु आलं की आपला चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा व्हायला लागतो, अन मग ती व्यक्ती पुढे काय म्हणतेय याचा मुळीच विचार न करता आपले मन आपल्या कानांमधुन आपण सराईतपणे काढून घेतो. थोडक्यात, “बाह्यरुपासी पाघळे, अंर्तमनासी ना कळे” यासारखीच अवस्था. यावर सामान्यत: आपली रिऍक्शनही ठरलेली असते, “हे सगळे परिणाम सरकारी आरक्षणाच्या फाजील कौतुकांचे आहेत.” – पण आता खालील वाक्ये बघा…

“थोडी रिव्हर्स घेऊन गाडी पार्क करा, म्हणजे बाकीच्या मेंबरर्सना प्रॉब्लेम नको”

“हॅपी बर्थडे टु यु…. हॅपी बर्थडे डिअर…”

“माज्या मणाचं मी काही सांगीतल न्हाइ त्यान्ला, जे रिअल घडलं तेच सांगीतलं”

“राकेशच्या या जोरदार पफॉर्मन्स नंतर मी स्टेजवर बोलवते…”

वरिलपैकी एकतरी वाक्य आपण आजवर उच्चारलं असेल, किंवा जवळून ऎकलं तरी असेल. यातील कोणते वाक्य आपल्या मातृभाषेतील म्हणता येईल? याही आधी मला विचारावेसे वाटते, की मातृभाषा म्हणजे तरी नक्की काय?

लौकिकार्थाने, आपली आई लहानपणी सर्वात प्रथम आपल्याला जी भाषा शिकवते ती आपली मातृभाषा. अर्थात भाषा बनली असते शब्दांनी. “काय झालं बाळाला? भुऽऽर जायचं? बाबा ऑफिसमधुन आले की जाऊ हं” अस जर आईच तान्हुल्याला समजावत असेल तर त्यातील ’ऑफिस’ हा शब्द कुठल्या भाषेतला?

हे झाले शब्दांचे, आता या शब्दांचे उच्चारण हे भाषेचे आणखीन एक वैशिष्ठ. हेच वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांताच्या लहेज्याप्रमाणे वेगवेगळ्या लकबीत उच्चारले जात असते. आपल्या आईने शिकविलेली [शब्द व उच्चारणासहीत] भाषा जर मातृभाषा म्हणायचे ठरविले तर मग कोणत्याही प्रकारची मराठी ही शुध्दच समजावी लागेल. मला लहानपणापासून एका विशिष्ठ उच्चारांचीच सवय झाली असेल, मीच काय पण माझे आख्खे कुटुंब, शाळेतले मास्तर, गाव, तालुक्यातली सगळीच माणसे तशीच बोलत असतील, तर ते मी अशुध्द का समजायचे?

आता इथे मुद्दा येतो, की कोणत्याही भाषेची शुध्दता ठरविण्याचे मापदंड कोणते? अन असे मापदंड जरी आपण ठरवले, तरी आपणच त्यांचे किती निष्ठेने पालन करतो? जाता-येता अगदी बारीक सारीक भाषिक चुका काढणारे आपण काही बाबतीत मात्र आश्चर्यकारक रित्या गप्प रहातो. आता हेच पहा, आपल्या लहानपणी घोकलेल्या तर्खडतरी व्याकरणाला फाटा मारीत, कोणत्याही भाषेतील वाक्याच्या ’कर्ता-कर्म-क्रियापद’ या प्राथमिक गरजांना बगल देत, समस्त अमेरिकन जनता “यु गोईंग देअर?” “आय गो शॉपींग” वगैरे तद्दन अशुध्द फराटे मारीत असते, अन बोर्डात इंग्रजीत स्कोअर केलेले आपल्यातले बरेच गुणीजन काही महिने “युएस” मधे राहिल्यावर असलेच तिरपाकडे बोलायला लागतात, ते कोणत्या प्रभावामुळे? समृध्दीच्या की पैश्याच्या? का इथेही ’बळी तो कान पिळी’ हाच नियम?

हे झाले साहेबाच्या भाषेचे, पण आपल्याकडचे थोडे वेगळे उदाहरण द्यायचे झाले तर बहिणाबाईंचे देता येईल. त्यांच्या काव्यातून उमटणारी वैचारिक प्रगल्भताच इतकी गाढ आहे, की शुध्दाशुद्धीच्या विचारांचा स्पर्शही मनाला लागू न देता आपण त्यात तल्लीन होऊन जातो. त्यांचे साहित्य आपल्या ’पीएचडी’ साठी विषय म्हणुनही स्विकारतो. इथे प्रभाव असतो विचारांचा, त्यांच्या नादमधुर मांडणीचा व साध्या सोप्या सरळ भाषेत मांडलेल्या आयुष्याच्या तत्वज्ञानाचा. अशावेळी राजमान्य भाषेपेक्षा त्यांची भाषा वेगळी असल्याचे आपल्याला जाणवतही नाही.

मला सांगा, अशी या पृथ्वीतलावर कोणती भाषा आहे, जी संपूर्ण जगभर सारखीच बोलली जाते? इंग्रजीचेच उदाहरण घ्या, ब्रिटीश बोलतात त्यांच्या पध्दतीने, अमेरिकनांची वेगळीच तर्‍हा, आपले उच्चार वेगळे, दाक्षिणात्यांचे तर त्याहूनच निराळे. लखनवी भागात सालंकृतपणे आढळणारी आपली हिंदीसुध्दा राजधानीत वेगळ्या ढंगाची, आणि मुंबई-पुण्यातल्या हिंदीबद्दल तर बोलायलाच नको. इंग्रजीबद्दलच बोलायचे झाले तर त्यातील शब्दांची स्पेलींग्सही अमेरिकेत वेगळी. जर एकेकाळी बहुतांश जगावर राज्य गाजवलेल्या व आज जगात सर्वात जास्त बोलल्या जाणार्‍या साहेबाच्या भाषेची ही दशा, तर केवळ एका प्रांतातील मराठी भाषेची काय कथा?

ज्ञानेश्वरांनी एकेकाळी “अमृतातेही पैजा जिंके” असा गौरव केलेली मराठी आज कुठे बोलली जाते? कुठेच नाही, अगदी आळंदीतही. पण तरिही आपण सार्वजनीक प्रसंगी मराठीबद्दल बोलताना या उक्तिचा वापर सर्रास करित असतो, तो कशाच्या जीवावर. बदल हा जर जीवनाचा आत्मा समजला तर त्याला भाषेचा अपवाद कसा असणार. खरं सांगायचं तर नवीन शब्दांनी समृध्द होणारी, व सतत बदलांना सामावून घेणारी भाषाच काळाच्या कसोटीवर तावून सुलाखुन टिकते. अन्यथा सर्व भारतीय भाषांची जननी समजल्या जाणार्‍या संस्कृत भाषेसारखी रोजच्या संभाषणातुन लुप्त होते.

आज ऑक्सफर्ड डिक्शनरीमधे ’रोटी’, ’शुक्रिया’, ’साकुरा’ हे शब्द आढळतात, तसेच आपणही रोजच्या जीवनात अनेक इतर भाषिक शब्द नकळत वापरीत असतोच. आपण आपले ’मनसुबे’ ’खुषी’ने इतरांना सांगताना विचार करतो का की हे शब्द मुळचे मराठीतले नाहीत म्हणून? साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेल्या पाडगांवकरांच्या ’सलाम’ कवितेचे शिर्षक अन्यभाषिक म्हणायचे का ?थोडक्यात काय, नक्की भाषा आहेच कशासाठी? संवादासाठी. मग आपण तिच्या शुध्दतेचा मुद्दा करुन विसंवादासाठी वापर का करित आहोत?

तुमची मते नक्की कळवा…

देवा मला पुढच्या जन्मी झुरळ कर…

झुरळावरील माझी कविता वाचून माझ्या अनेक हितचिंतकांनी काहिश्या आश्चर्याने, कुतुहलाने, चेष्टेने व काहींनी तर सहानभूतीने संपर्क साधला. त्या सगळ्यांशी बोलून मलाही असे वाटू लागले की यावरही काहितरी लिहावे… अन पुन्हा एकदा चौथी-पाचवीच्या इयत्तेत लिहायचो तसा निबंधच का लिहू नये असाही विचार आला. म्हणुनच हा ब्लॉग –

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण माझा आवडता प्राणी आहे झुरळ. आजच्या घडीला झुरळाच्या सुमारे ५००० प्रजाती जगभरात अस्तित्वात आहेत, व त्यातल्या बर्‍याचश्या विषुववृत्तीय प्रदेशांमधे आढळतात. झुरळांना सहा तंतूमय पाय असतात, हे तंतू त्यांना स्पर्शज्ञान देण्यात मदत करतात. या प्रत्येक पायाला ३-३ गुडघे असतात [पीजे: मग यांना “नी-तिन” म्हणावे का?]. नेहमीच्या तपकिरी रंगाच्या झुरळांशिवाय हिरवी, पिवळी व काही लाल रंगाचीही झुरळे काही जंगलात आढळून आली आहेत. पण ही सगळी झाली अगदीच तांत्रिक माहिती… माझी झुरळांविषयीची आवड यावर मुळीच आधारलेली नाही.

झुरळांबाबत अगदी अचंबित करुन टाकणारी काही माहिती:
१. दक्षिण ध्रुवापासून ते उत्तर ध्रुवापर्यंत अस्तित्व असलेला झुरळ हा एकमेव प्राणी आहे.
२. अन्नाविना एक झुरळ अगदी एक महिन्यापेक्षाही जास्त काळ राहू शकते, अन पाण्याविना एक आठवडासुध्दा.
३. झुरळांना वेगळा मेंदू नसतो. आपल्या मज्जारज्जूप्रमाणे एक नर्व्ह झुरळाच्या शेपटीपासून ते डोक्यापर्यंत जाते त्यामुळे कोणत्याही बाजूने होणा‍र्‍या हल्ल्याची त्यांना तात्काळ जाणीव होते. प्रतिक्षिप्त क्रियेच्या वेगाची तुलना करता झुरळे माणसांना सहज मागे टाकतात.
४. झुरळे निष्णात जलतरणपटू आहेत, याचे महत्वाचे कारण म्हणजे सुमारे ४० मिनीटांपर्यंत श्वास रोखुन धरण्याची त्यांची क्षमता.
५. अमेरिकेत आढळणारी झुरळे सर्वात जलद पळणारी समजली जातात. त्यांचा वेग आहे सुमारे ३ मैल प्रतीतास.
६. श्रीयुत झुरळ त्यांच्या श्रीमतींपेक्षा वजनाने कमी असतात.
७. सुमारे २८ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या जिवाश्मांमधे आजवर झुरळांचे अस्तित्व सापडले आहे. थोडक्यात काय, पृथ्वीवरुन महाकाय डायनासोर नाहिसे झाले तरी झुरळे तगून राहिली.
८. झुरळाचे हृदय म्हणजे केवळ झडपा असलेली एक नळी असते.
९. झुरळांचे डोके छाटले तरी ती सुमारे आठवडाभर जिवंत राहू शकतात. आठवड्यानंतरही मरण्याचे कारण म्हणजे तोंडाअभावी पाणी पिता न येणे, इतकेच.
१०. एरवी जरी झुरळे कितीही धावपळ करताना दिसली तरी त्यांच्या आयुष्याचा ७५% काळ ती विश्रांती घेत घालवतात.
११. बरिचशी झुरळे उणे ३२ डिग्री तापमानातही जिवंत राहू शकतात. आता कळलं का आपल्या फ्रिजरमधे झुरळे का असतात ते?
१२. झुरळाचा एक डोळा सुमारे ४००० छोट्याछोट्या लेन्सेसचा बनलेला असतो, ज्याच्यामुळे त्याला एकाचवेळी ३६० अंशात बघणे शक्य होते.

हे सगळे वाचुन तुम्हालाही वाटेलच, की पुढचा जन्म मिळणार असेल तर तो झुरळाचाच मिळावा. फार काही नाही तरी ७५% काळ झोपेत तरी घालवता येईल.

शाळेतले झुरळ

एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश;

सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश.

बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर;

घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर.

झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका;

तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका.

सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग;

शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!

ब्रेस्ट-कॅन्सर: एक कविता

ब्रेस्ट-कॅन्सरचे निदान ऎकून मनात येणार्‍या भावनांचे हे विविध टप्पे…
…प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनुभवलेले.

काल होते नीट, आज गमावला सूर;
     भासू लागे सारे मला, धूसर धूसर
काय केला गुन्हा, आला आजार हा भाळी;
     माझीयाच घरा लागे नजर का माझी ?
गमावले सुख, सारे एकाच क्षणात;
     रीती झाली संध्याकाळ, तनात-मनात
मनी वाटे, सांगू नये कोणालाही काही;
     आपलेच भोग, मन एकटेच साही
काढले चिमटे, तरी दु:स्वप्न तुटेना;
     सैरभैर मन, कशामधेही रमेना
सख्या येती भेटायाला, सांगती अनुभव;
     कोठल्या, कोणाची, एक तरी आठवण
बोलता सांगता, फेरा इतरांचा कळे;
     घरटी एक माता याच्या आगीमधे जळे
एकाकी सोसले काही जणींनी हे दु:ख;
     क्लेश झाले कमी, दिसे दु:खातही सुख
नशिबी आले भोग जरी आज माझ्यासाठी;
     फुलापरी ठेवी लेक, बहिणी आणि पती
जन्मा आली नवी नाती, नवे भावबंध;
     हळव्या मना धीर देई मायेचा सुगंध
आज खरा कळे मज नात्याचा पसर;
     लेक होई आई, घाली मनाला फुंकर
दूर होई मनावरी साठले मळभ;
     बदलली नाही, माझी एकही ओळख
रोग फक्त शरीराला ग्रासुनिया जाई;
     मन परी अ-बाधित, निरोगीच राही
मी असेन याही पुढे, काल होते तशी;
     पाण्यापरी नितळ, माझ्या मनापरी जशी